राज्यात लवकरच मॉन्सून लावणार हजेरी, उद्यापर्यंत अंदमानात होणार दाखल
बंगालच्या उपसागरातील ‘मोचा’ चक्रीवादळ (Mocha Cyclone) निवळल्यानंतर अंदमान, निकोबार बेट समुहावर नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल होण्यास पोषक हवामान झाले आहे.
शुक्रवारपर्यंत (ता. १९) मॉन्सून दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळेनुसार मॉन्सून साधारणत: २१ मेपर्यंत अंदमानाची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे पोचतो. त्यापूर्वीच तो दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होतो.
तर १ जूनपर्यंत केरळमध्ये मॉन्सून दाखल होतो. यंदा १९ मेपर्यंत मॉन्सून अदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
गतवर्षी १६ मे रोजी मॉन्सूनने अंदमान बेटांचा बहुतांशी भाग व्यापला होता. तर २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मॉन्सून १० जून महाराष्ट्राच्या तळकोकणात दाखल झाला होता.
यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा सर्वसाधारण (९६ टक्के) पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) ११ एप्रिल रोजी जाहीर केला.
या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात एल-निनो स्थिती राहण्याची, तसेच इंडियन ओशन डायपोल (आयओडी) धनात्मक (पॉझिटिव्ह) राहण्याची शक्यता आहे.
चार जूनपर्यंत मॉन्सूनच्या केरळ दाखल होण्याचे संकेत आहेत. मे महिन्याच्या अखेरीस मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट होणार आहे.
मॉन्सूनचे अंदमानातील आगमन
वर्ष | आगमन |
---|---|
२०१८ | २५ मे |
२०१९ | १८ मे |
२०२० | १७ मे |
२०२१ | २१ मे |
२०२२ | १६ मे |